Latest news

Thursday 22 August 2013

पुरुषहो, तुमच्यासाठी...

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

पुरुष म्हणजे कुटुंबाची भिंत... त्याच्याशिवाय चांगल्या समाजाची कल्पनाच करवत नाही. असा हा पुरुष आज अडचणीत आहे. काही मोजक्या पुरुषांच्या एखाद्या कृत्याचे खापर अख्ख्या पुरुषजातीवर फोडले जाते. खरेतर, त्याच्यावरच अनेकदा अन्याय होतो. खोट्या गुन्ह्यांमध्ये तोच टार्गेट होतो. त्याचे ना कुणी ऐकत ना त्याच्या मदतीला जात. पुरुषांच्या याच अंतरंगाचा वेध घेण्यासाठी पहिल्यांदाच सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशनतर्फे (सिफ) नागपूर विभागात पुरुष परिषद घेण्यात आली. पुरुषांच्या विविध समस्यांचा उहापोह येथे झाला. फाउंडेशनतर्फे पेंच येथे हे ५ वे पुरुष हक्क राष्ट्रीय अधिवेशन झाले. संपूर्ण भारतामधून ४० हजार कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व करणारे शेकडो मेन्स राइट्स कार्यकर्ते या अधिवेशनासाठी जमले होते.

...तर स्वातंत्र्यदिन मानणार नाही

सरकारकडून पुरुषाला हीन वागणूक मिळते. त्याच्या भावना कधीच जाणून घेतल्या जात नाहीत. केवळ महिलांच्याच वाट्याला सहानुभूती येते. सरकार, न्यायालय केवळ महिलांचीच बाजू ऐकते. पुरुषाला तर बोलण्याचा अधिकारच नाही. चहूबाजूंनी पुरुषांची मुस्कटदाबी होते. अनेकदा महिलांकडून त्यांच्या बाजूने असलेल्या कायद्यांचा गैरवापर केला जातो. केवळ वचपा म्हणून तर कधी काही स्वार्थ साधण्यासाठी पुरुषांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात येतात. मग पुरुष स्वतंत्र कसा, असा सवाल अधिवेशनात उपस्थित करण्यात आला. सरकारने पुरुषांच्या बाजूने विचार न केल्यास स्वातंत्र्यदिन साजरा का करायचा, असा सवालही उपस्थित करण्यात आला.

संशोधनाची गरज

सध्या पुरुषांसाठी भारतामध्ये पुरुष हक्क, पुरुषांच्या मानसिक व शारीरिक समस्या या विषयावर कुठेही कसलाही संशोधन किंवा शैक्षणिक आभ्यासक्रम अस्तित्वात नाही. असशा संशोधन किंवा शैक्षणिक अभ्यासक्रमाची नितांत गरज असल्याचे मत ' सिफ ' ने अधिवेशनात मांडले. अशा अभ्यासक्रमामुळे पुरुषत्वाची जाणीव लोकांपर्यंत पोहाचेल ज्यामुळे समाजात पुरुषांला चांगले जीवन जगता येईल, व चांगला समाज घडेल, असे मत व्यक्त करण्यात आले.

हाच खरा भेदाभेद

समाजातील गुन्हे आणि समस्यांसाठी केवळ पुरुषांनाच जबाबदार व गृहित धरण्यात येते. अनेक घटनांत तर महिलांनी पुरुषांपेक्षा कितीतरी गंभीर गुन्हे केले आहेत. ते कधीच प्रकाशात येत नाहीत. इथे मग ' समानता ' कुठे गेली? जर समाज पुरुषाला मानसन्मान देऊ शकत नसेल, तर त्या समाजाने पुरुषांकडून कुठलीच अपेक्षा करून नये. त्याला शिक्षा करण्याचा किंवा त्याला दोष देण्याचाही अधिकार नाही, असे स्पष्ट मत ' सिफ ' चे मध्य भारत अध्यक्ष राजेश वखारिया व अन्य मान्यवरांनी व्यक्त केले. अधिवेशनादरम्यान ३० सत्रांत पुरुषांच्या विविध समस्यांवर विचारमंथन झाले.

असे हे ठराव

- पुरुषाला शांततामय जीवन जगण्याचा अधिकार आहे.
- पुरुषाला कायदेशीर रूपात निःपक्ष व समान अधिकार मिळावेत, जे लिंगभेदरहित असावेत.
- प्रोस्टेट कॅन्सर, पार्किन्सन्स, हृदयविकार आदी आजारांपासून त्यांना रोखण्याकरिता पुरेशी आर्थिक गुंतवणूक करण्याची गरज आहे.
- पुरुषांबद्दलचे पूर्वग्रह दूर व्हावेत. त्यासाठी पुरुष कल्याण मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी.
- फादर्स राइट्सचे रक्षण करून शेअर पॅरेंटिंगला मान्यता देण्यात यावी.
- संसदेसमोर येऊ घातलेला हिंदू विवाह संशोधन कायदा संमत न करता खारिज करावा. 


http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/nagpur-vidarbha/--/articleshow/21958614.cms 

No comments:

Post a Comment